मैदानावर खेळायला जायचे आहे किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल आणायला जायचे आहे, अशी कारणे देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली जात होती. या पार्श्वभूमीवर सायंकाळी मैदानांवरील प्रवेश बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रेस्टॉरंटची पार्सल सेवाही बंद करण्यात आली आहे. रेस्टॉरंटमधून सायंकाळी ४ नंतर केवळ होम डिलिव्हरीची सोय असेल. करोनाचे संकट टाळण्यासाठी कडक संचारबंदी लागू करणे अनिवार्य असून याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी काढला.
राज्यात डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. २८ जून सकाळी ७ वाजतापासून लागू करण्यात आलेले नियम ५ जुलैला सकाळी ७ पर्यंत लागू आहेत. नवे नियम ५ जुलैला सकाळी ७ पासून १२ जुलै सकाळी ७ पर्यंत लागू राहणार आहेत. नागपूरसाठी तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू असून सायंकाळी ५ नंतर अत्यावश्यक कामे वगळता कुणीही बाहेर पडू नये, असे बदल नव्या आदेशात करण्यात आले आहेत.
इतर कुठलाही बदल करण्यात आला नसून मॉल्स, थेटर, नाट्यगृह, धार्मिक स्थळे, स्विमींग पूल, शाळा, कॉलेज आणि शिकवणी वर्ग बंदच राहणार आहेत.
नागपूरमध्ये काय सुरू…काय बंद?
अत्यावश्यक सेवेचे दुकान : सायंकाळी ४ वाजेर्यंत
इतर दुकाने : सायंकाळी ४ पर्यंत (शनिवारी आणि रविवारी बंद)
रेस्टॉरंट : ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत. त्यानंतर केवळ होम डिलिव्हरी
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलींग : सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत (प्रत्येकदिवशी)
खासगी कार्यालय : सायंकाळी ४ वाजेपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळून)
सरकारी आणि खासगी कार्यालयातील उपस्थिती : ५० टक्के (करोनासाठी काम करणारे कार्यालय वगळून)
खेळ : सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत
लग्न सोहळा : ५० टक्के क्षमतेने किंवा ५० व्यक्तींची उपस्थिती (जी संख्या कमी असेल). वेळेची मर्यादा ३ तास.
अंत्यविधी : अधिकाधिक २० व्यक्तींची उपस्थिती. वेळेची मर्यादा ३ तास.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times