नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्यतिरिक्त जोरदार चर्चा सुरू आहे ती टोकियो ऑलिम्पिकची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल, पण त्याला घाबरून ना खेळाडूंनी सराव कमी केला ना हिंमत हारली. भारताची महिला जलतरणपटू माना पटेलला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. भारतीय जलतरण महासंघाने (AFI) दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कोट्यातून मानाची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. विद्यापीठ कोट्यातून एका देशाच्या एका पुरुष आणि महिलेला ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येतो. त्यामुळे माना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. गुजरातची 21 वर्षीय माना 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये भाग घेईल. या खेळासाठी पात्र ठरणारी माना तिसरी भारतीय तर पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. यापूर्वी हा मान श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश यांना ऑलिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश मिळवला होता.

2019मध्ये घोट्याला दुखापत झाल्याने माना अनेक दिवस स्पर्धांपासून दूर होती. या वर्षाच्या सुरवातीला तिने कमबॅक केलं. ती म्हणाली की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मला दुखापतीतून बरे होण्यास मदत झाली. त्यानंतर निराशाही आली होती. खूप दिवस पाण्यापासून दूर राहण्याची मला सवय नाही. पण आता ऑलिम्पिकवारी घडणार असल्याने मी उत्सुक आहे. मी यंदा जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धेत भाग घेईन.

यंदा एप्रिलमध्ये उझबेकिस्तानमध्ये पार पडलेल्या ओपन जलतरण स्पर्धेत तिने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभाग घेतला आणि एक मिनिट 4.47 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. उझबेकिस्तानमधील चांगल्या कामगिरीमुळे मानाचा आत्मविश्वास उंचावला आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सर्बिया आणि इटलीतील जलतरण स्पर्धेत मानाने भाग घेतला होता. दुसरीकडे बेलग्रेडमधील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने राष्ट्रीय विक्रम केला होता. एक मिनिट आणि तीन सेकंदामध्ये तिने ही शर्यत पूर्ण केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 मिनिट 2 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे मानाने म्हटले आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही मानाचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माना टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू आहे. मी तिचे अभिनंदन करतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here