म. टा. विशेष प्रतिनिधी,
कायम वाहनांची वर्दळ असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-६६) रुंदीकरणाचा प्रकल्प ११ वर्षांपूर्वी सुरू होऊनही त्याची रखडपट्टी आजही कायम आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्रही सुरूच आहे. रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून म्हणजेच जानेवारी २०१० ते एप्रिल २०२१ या कालावधीत या महामार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये तब्बल दोन हजार ४४२ जणांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या महामार्गाच्या प्रश्नावर जनहित याचिका करणारे अॅड. ओवेस पेचकर यांनी हे विदारक वास्तव मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडले आहे.

मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील असलेले पेचकर यांनी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याकडे आणि अनेक ठिकाणी सदोष काम होत असल्याकडे याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे २०१० मध्ये सुरू झालेले काम आता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाही या महामार्गाचेच काम संथ का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याची दखल घेत या महामार्गाचे किती काम झाले, याविषयीच्या प्रगतीची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने १ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) व राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत केंद्र व राज्य सरकारकडून याविषयीची माहिती सादर होऊ शकली नाही. ही बाब निदर्शनास आणतानाच पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचेही पेचकर यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले. तेव्हा, खंडपीठानेही त्याविषयी विचारणा केली असता, पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात पाचारण करून माहिती सादर करू, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.

वाचा:

दरम्यान, ही याचिका प्रलंबित असतानाच महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाच्या काळात अपघातांमध्ये एकूण किती मृत्यू झाले, अशी माहिती पेचकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्याविषयी राज्य अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने मे महिन्यात दिलेल्या उत्तरानुसार, एकूण दोन हजार ४४२ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. हे विदारक वास्तव त्यांनी अतिरिक्त कागदपत्रांमार्फत न्यायालयात मांडले आहे.

‘अपघात रोखण्यासाठी उपाय करा’
‘मुंबई-गोवा महामार्गाची सध्याची स्थिती बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ता आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या काही ठिकाणांवर सुरक्षारक्षकही नाहीत. शिवाय सध्या पावसाळी दिवस सुरू आहेत. त्यामुळे अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी एनएचएआय व पीडब्ल्यूडी या दोन्ही प्रशासनांनी तातडीने पावले उचलावीत. खड्ड्यांच्या ठिकाणी तातडीने डागडुजी करण्यासह रुंदीकरणाची कामे सुरू असलेल्या ठिकाणांवर अडथळे उभारण्याचीही पावले उचला. जेणेकरून अपघात टळतील आणि आणखी जीव जाणार नाहीत’, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले. तसेच रुंदीकरणाचे काम किती पूर्ण झाले आणि कधीपर्यंत पूर्ण होणार याचा तपशील पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देशही दोन्ही प्रशासनांना दिले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here