पुणे: ऑनलाइन गेम पबजी खेळताना एका तरुणाशी झालेली मैत्री पुण्यातील ३५ वर्षीय महिलेला महागात पडली आहे. या तरुणानं या महिलेचं आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यावर पैसे दिले नाहीत म्हणून या तरुणानं महिलेचे फोटो तिच्या पतीला आणि कुटुंबीयांना पाठवले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये राहणारा राजा मेहरा याची आणि पीडितेची पबजी गेम खेळताना मैत्री झाली होती. त्याचदरम्यान तो पुण्यात नोकरीसाठी आला होता. पीडितेनं त्याला पुण्यातील आपल्या घरात राहण्यास सांगितलं. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, झारखंडमधील राजा याच्याशी पबजी गेम खेळताना ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. राजानं तिचा मोबाइल क्रमांक मागितला. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणं सुरू झालं. त्याचवेळी आपल्याला पुण्यात नोकरी मिळाली आहे, असं त्यानं सांगितलं. ऑक्टोबर २०१९ मध्ये तो पुण्यात आला आणि आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळं काही दिवस तुमच्या घरी राहू शकतो का असं महिलेला विचारलं.

२० ऑक्टोबरला राजा तिच्या घरी आला. तिनं राजाला घरी राहण्याची परवानगी दिली. त्याचदिवशी दुपारी महिला बेडरूममध्ये झोपली होती. ती झोपेत असताना त्यानं तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. झोपेतून जागी झाल्यानंतर तिला याबाबत समजलं. तिनं त्याला जाब विचारला. राजानं केलेल्या कृत्याची कबुली दिली आणि तो पुन्हा झारखंडला गेला. त्यानंतर त्यानं या फोटोंवरून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैशांची मागणी केली. बरेच महिने तो तिला त्रास देत होता. मात्र, तिनं पैसे दिले नाहीत. १४ फेब्रुवारीला त्यानं तिचे सर्व फोटो पतीला आणि कुटुंबीयांना पाठवले. तुझ्या मुलीसोबत सुद्धा असंच करीन अशी धमकीही दिली. अखेर महिलेनं सांगवी पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here