म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक प्रादूर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह बालरोगतज्ज्ञांच्याही वैद्यकीय नियोजन तसेच पूर्वतयारीला वेग आला आहे. मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले असले तरीही सर्वसामान्य मुलांसह कुपोषित मुलांच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरजही व्यक्त होत आहे.

कुपोषणाच्या प्रश्नांवर काम करणारे डॉ. सुधीर पाटील म्हणाले, ‘कुपोषित मुलांची रोगप्रतिकारशक्ती खंगलेली असते. ही मुले लगेच कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला बळी पडू शकतात. त्यामुळे या मुलांच्या आरोग्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची गरज आहे. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषणाचे प्रकार आहे. काही मुले अति खाऊन अतिलठ्ठ गटामध्येही मोडतात. त्यांच्या स्थुलतेमुळे या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. तर कुपोषित वर्गातील मुलांना पोषण आहार न मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात.’

वाचा:

तिसरी लाट आल्यास मुलांना सर्वाधिक संसर्ग होईल का, याविषयीवर वेगवेगळ्या प्रकारची मतांतरे बालरोगतज्ज्ञांमध्येही आहेत. काही मुलांनी ताप येऊ नये तसेच पावसाळ्यातील आजारांचा त्रास होऊ नये यासाठी लसही घेतलेली आहे. ती घेतल्यामुळे करोनाचा संसर्ग होणार नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतो. बालरोगतज्ज्ञ डॉ. आशीष मोटे म्हणाले, ‘करोनापासून या लसी खात्रीशीर संरक्षण देतील का हे सांगता येत नाही. कारण या विषाणूचे वर्तन वेगळे आहे. मात्र पावसाळ्यामध्ये होणाऱ्या संसर्गाचा त्रास मुलांमध्ये कमी व्हावा यासाठी निश्चितपणे मदत मिळेल. त्यामुळे केवळ याच वर्षात नाही, तर प्रत्येक वर्षी इन्फ्लुएन्झाचे लसीकरण करून घ्यावे.’

मातांचाही प्रश्न महत्त्वाचा

कुपोषित मातांचाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. करोना संसर्गामुळे कुपोषित मुलांच्या पोषण आहाराच्या संदर्भात राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलांची उंची-वजनाच्या नोंदी घेणे, गर्भवती मातांच्या वैद्यकीय तपासणीचे काम योग्यप्रकारे व योग्यवेळी पूर्ण व्हायला हवे, याकडे आरोग्यकार्यकर्ते कृष्णा वेल्हे लक्ष वेधतात. सुदृढ माता ही निरोगी बाळाला जन्म देते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी मातांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here