वाचा:
राज्यातील करोनाचा धोका अद्यापही कायम आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिएंटचे काही रुग्णही राज्यात आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी सरकारनं नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, पायी वारीला मनाई करताना मानाच्या पालख्या एसटीनं बसनं पंढरपूरला नेण्याची परवानगी दिली आहे. सरकारचा हा निर्णय धुडकावून लावत कराडकर यांनी पायी वारी करण्याची भूमिका घेतली होती. ‘वाघ म्हटले तरी खातो अन वाघ्या म्हटलं तरीही खातोच’ असं म्हणत त्यांनी सरकारला अंगावर घेण्याची भाषा केली होती. त्यानुसार, आज कराडकर यांनी आपल्या समर्थकांसह पायी वारी सुरू केली. पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या वारकऱ्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. कराडकर यांना ताब्यात घेतल्यामुळं त्यांचे समर्थक व भाजपचे आमदार महेश लांडगे संकल्प गार्डन येथे पोहोचले आहेत. त्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.
‘उद्धवजी, अजित पवार परिणाम भोगायला तयार रहा’
बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं भाजप संतापला आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला असून सरकारला इशारा दिला आहे. ‘मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?,’ असा सवाल भोसले यांनी केला आहे. ‘शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही. उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा,’ असा संताप भोसले यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times