अकोले: लिंगभेदाबाबत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या विधानावरून वादळ उठलेले असताना आता इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका एकवटला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींत महाराजांचे समर्थनार्थ गुरुवारी ठराव घेण्यात येणार आहेत. त्यानंतर रविवार दि. २३ फेब्रवारी रोजी तालुका बंद ठेवण्यात येणार असून टाळ, मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

महाराजांच्या समर्थकांची आज दुपारी अकोले येथे बैठक झाली. यावेळी महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्याने उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराजांची नाहक बदनामी सुरू आहे. महाराजांनी कीर्तनात पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. वक्तव्यावर झालेल्या वादानंतर महाराजांनी दिलगिरी व्यक्त करूनही सूडभावनेने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचून महाराजांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा भावना अनेकांनी बैठकीत व्यक्त केल्या.

अकोले तालुक्याच्या वतीने या सर्व प्रकाराचा निषेध करुन महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा व महाराजांना पाठिंबा देणारा ठराव तालुक्यातील ग्रामपंचायतींत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार व शनिवार सुट्टी असल्याने गुरूवारीच सर्व ग्रामपंचायतींत ठराव मंजूर करण्यात यावेत, असेही ठरले. त्याबाबतचा मजकूरही बैठकीत देण्यात आला. तसेच रविवार संपूर्ण तालुका बंद ठेवून महाराजांचे गाव असलेल्या इंदोरी येथून मोटारसायकल रॅलीने अकोले शहरात येवून महात्मा फुले चौकातून टाळ मृदुंगाच्या निनादात बाजारतळापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here