प्रभादेवी : संसाराची सुरूवात करताना आपल्याला मिळालेल्या मित्रांच्या आहेरातून आणि लग्नाची वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबियांना धान्यदान करून लग्न सोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने केलं आहे. या जोडप्याच्या कामाचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

“तुम्ही मला जो लग्नाचा आहेर देणार आहात, तो मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी दिलात तर मला जास्त आनंद होईल,” असा मेसेज आपल्या मित्रांना लग्नाच्या आदल्या दिवशी टाकला आणि आपल्या वरातीचा प्लॅन रद्द करत त्याचा खर्चही प्रफुल्लने मंडळाला दिला. त्याच्या मित्र मंडळींनी त्याच्या इच्छेनुसार आहेर आणि वरातीच्या जमा झालेल्या पैशातून गरीबांसाठी धान्य विकत घेतले आणि लग्नबंधनात अडकल्यानंतर गावडे नवदाम्प त्यांच्याच हस्ते वडाळा पश्चिमेला फुटपाथवर राहात असलेल्या 60 गरीब कुटुंबियांना धान्यदान करण्याचे कार्य केले.

गेले 50 दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंच्या मदतीसाठी प्रफुल्ल गावडे कार्यरत होता. लोकांची मागणीही धान्याचीच असायची. पण ती पूर्ण करण्याची क्षमता ना मंडळाची होती ना प्रफुल्ल गावडेची. त्यामुळे धान्यदान करता येत नव्हते. पण गरजूंना किमान 15 दिवसांचे तरी धान्य द्यायचे हा विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता. मंडळाच्या या सत्कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिंकडून धान्याची मदतही मिळू लागली होती.

मंडळाच्या माध्यमातून देह विक्रय करणाऱ्या महिला, किन्नर, फुटपाथवरचे गरीब, रूग्णालयांबाहेरचे त्रस्त नातेवाईक आणि रूग्ण या सर्वांना आपल्यापरीने अन्नदानही केले. पण हे अन्नदान करताना अनेकांची फक्त एक मागणी असायची ती म्हणजे धान्याची.

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या प्रफुल्लच्या लग्नाची तयारीही सुरू होती. प्रफुल्लला आहेर म्हणून देण्याची तयारी त्याचे मित्र करत होते. ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या भावस्पर्शी मनाला हे खटकलं. माझ्यापेक्षा अधिक गरज त्या असंख्य गरीब-गरजू कुटुंबांना आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी दोन वेळचे अन्नही नाही. मला आहेर नको, तेच पैसे तुम्ही गरीबांच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या मंडळाच्या उपक्रमासाठी वापरावेत, अशी इच्छा प्रफुल्लने व्यक्त करून त्याच पैशातून गरीब कुटुंबियांना धान्यदान करा, अस स्पष्ट केलं .

मित्र मंडळींनीही जमा झालेल्या आहेराच्या रकेमतून तांदूळ, गहूपीळ, तूरडाळ, मूगडाळ, साखर, पोहे आणि तेल खरेदी केले आणि वडाळा पश्चिमेला रफिक किडवई मार्गावरील फुटपाथवर रहात असलेल्या 60 कुटुंबियांना धान्य देण्याचे निश्चित केले. दिवसभर चाललेल्या लग्नाच्या सर्व पवित्र विधी आणि स्वागत समारंभानंतर सायंकाळी गावडे दाम्पत्यांनी गरीब कुटुंबांना धान्यदान करून त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here