मुंबई: बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल धडकल्याने मुंबईतील तब्बल ४ नामांकित हॉटेल्समध्ये आज दुपारी एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या नावाने असून चारही हॉटेल्समध्ये तपासणीत काहीच संशयास्पद न आढळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अंधेरीतील लीला, प्रिन्सेस इन, पार्क व रमाडा या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आज दुपारच्या सुमारास आला. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. त्यानंतर या पथकाच्या मदतीने सर्व हॉटेल्सची पाहणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब न सापडल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून हा ई-मेल नेमका कुणी केला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

ई-मेलची सखोल चौकशी

मुंबईतील चार फाइव्ह स्टार हॉटेल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. लश्कर-ए-तोयबाच्या नावाने हा ई-मेल पाठवण्यात आला आहे. या ई-मेलची आम्ही सखोल चौकशी करत आहोत, असे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांनी सांगितले.

मिरारोडच्या हॉटेललाही धमकी

एकीकडे मुंबईतील चाप हॉटेल्समध्ये बॉम्ब ठेवल्याबाबत ई-मेल आला असताना दुसरीकडे मिरारोड येथील पंचतारांकित सेव्हन इलेव्हन क्लब हॉटेललाही असाच धमकीचा ई-मेल आला. त्यात हॉटेल बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्याच नावाने हा मेल आला आहे. क्लबच्या अधिकृत मेल आयडीवर हा मेल आला आहे. क्लब वाचवायचा असेल तर, २४ तासांच्या आत ७ कोटी रुपये खात्यावर जमा करा, असंही मेलमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here