मुंबई: मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त यांनी ‘Let Me Say It Now’ या आपल्या आत्मचरित्रात, ‘अजमल कसाबला हिंदू दहशवादी म्हणून दाखविण्याचा प्रयत्न होता,’ असे नमूद केल्याने वादळ उठले असतानाच मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यासंबंधातील खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत महत्त्वाचा तपशील सांगितला आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ते हिंदू दहशतवादी असल्याचे दाखवण्याचा कट होता, या मताशी मी सहमत नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते तर कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. या सर्वांकडेच ओळखपत्रं सापडली होती आणि त्यावर हिंदू नावं होती, असेही निकम यांनी नमूद केले.

अजमल कसाबकडे जे ओळखपत्र सापडलं होतं त्यावर समीर चौधरी, हैदराबाद असे नाव होते, हे सत्य आहे असे नमूद करत सर्वच ओळखपत्रे बोगस असल्याचे चौकशीतून तसेच पुराव्यांतून स्पष्ट झाले होते. कसाबकडे आढळलेल्या ओळखपत्राची कसून चौकशी करण्यात आली होती. याबाबत हैदराबादमधील कॉलेजच्या प्राचार्यांची साक्षही नोंदवण्यात आली होती, असे निकम यांनी सांगितले. आपण पकडलो गेल्यास कट उघड होऊ नये, या उद्देशानेच ही बोगस ओळखपत्रे तयार करण्यात आली होती. भारतातील विद्यार्थी असल्याचे भासवावे, हा त्यामागील डाव होता. अन्य कोणताही उद्देश त्यात तेव्हा आढळून आला नव्हता, असे निकम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. कसाबने जो जबाब कोर्टात दिला होता त्यात त्याने बोगस ओळखपत्रांबाबत कबुली दिली होती. काफाने त्यांना मिल्ट्री ट्रेनिंग दिलं होतं. त्यानेच सर्व १० दहशतवाद्यांना ही बोगस ओळखपत्रं दिली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच ही ओळखपत्रे होती. दुसरा कोणताही उद्देश नव्हता. कोर्टात आम्ही हे सिद्ध केलेलं आहे, असेही निकम यांनी नमूद केले.

राकेश मारिया यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. त्यांनीही असं काहीही चुकीचं पुस्तकात लिहिलेलं नाही, असं म्हटलं आहे. कसाब पकडला गेला नसता तर ‘हिंदू दहशतवाद आहे’ हे दाखवण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान होते, अशा हेडलाइन्स वृत्तपत्रांत छापून आल्या असत्या, असे मी माझ्या पुस्तकात लिहिल्याचे मारियांनी मला सांगितले आहे, असे निकम यांनी पुढे नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here