हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ढग दाटून आले असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर विदर्भाच्या पूर्वेस अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुंबई आणि ठाण्यामध्ये मात्र कोरडं हवामान आहे.
पुण्यासह घाट परिसरातही ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी किंवा दुबार पेरणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे.
९ जुलैनंतर कोकणात जोर वाढणार
पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times