अमरावती: धामणगांव तालुक्यातील आजनगाव येथील प्रगतशील शेतकरी निखिल नंदकीशोर डुबे (वय ३८) यांना गुरुवारी कृषीरत्न सन्मान देण्यात आला. यानंतर घरी परतताना काही तासातच शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यावर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील सालनापूर फाट्याजवळ काळाने झेप घेतली आणि कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या तर्फे दरवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा १ जुलै रोजी असलेला जन्मदिन ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. योग्य नियोजनाच्या आधारावर आधुनिक शेती करून निखिल डुबे यांनी विविध पिकांच्या उत्पादनात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे मिरचीचे उत्पादनात निखिल दुबे यांनी धामणगांव रेल्वे तालुक्यातून अव्वल क्रमांक गाठला आहे. त्यासाठीच पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा ‘कृषीरत्न’ पुरस्काराने गौरव केला होता.

मात्र, हा आनंद निखिल यांच्यासाठी केवळ काही तासांचा ठरला. निखिल डुबे धामणगाववरून त्यांच्या गावी आजनगाव येथे कारने जात असताना यवतमाळ मार्गावरील सावळा गावाच्या परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला व त्यांचा मृत्यू झाला. पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जाहीर होणारा कृषी रत्न पुरस्कार निखिल डुबे यांना जाहीर करण्यात आला होता.

गुरुवारी त्यांना पंचायत समिती कार्यालयात सन्मानित करण्यात आले होते. यावेळी सभापती महादेवराव समोसे, गटविकास अधिकारी माया वानखडे, तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले तसेच जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम व पंचायत समिती उपसभापती माधुरी दुधे यांची उपस्थित होती. पुरस्कर स्विकारल्यानंतर काही तासात ही घटना झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here