अमरावती : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर व इतर आजारांचे लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचारामुळे तिला पुनर्जन्म मिळाला आहे. उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या व त्यानुसार तत्पर औषधोपचारामुळे आज ती पूर्णत: बरी होऊन स्वत:च्या घरी परतली.

आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबिय व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अमरावती येथील रहिवासी इयत्ता दहावीची नेहा ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारार्थ डॉक्टरांकडे आणले. त्यावेळी तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्टाफने तिला दाखल करून घेत तत्काळ उपचार सुरू केले. नेहाला कोविड-19ची बाधा झाल्याचे आढळल्याने प्रथमत: तिच्यावर त्यानुसार उपचार करण्यात आले.

दरम्यान, तिचा ताप वाढू लागला होता. शरीराचे तापमान 104 पर्यंत पोहोचले होते. हे लक्षात घेऊन मेंदूचा सिटी स्कॅन, तसेच मेंदू व पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणी अंती मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आणि त्यानुसार उपचार करण्यात आले. नेहा सलग पंधरा दिवस कोमात होती. अशा स्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तिला कोमातून बाहेर काढले.

आज तिची प्रकृती सुधारली असून, तिला आज तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून घरी परतण्याची परवानगी मिळाली. सुपर स्पेशालिटीच्या स्टाफने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत तिला आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात डॉ. रवी भूषण, डॉ. निलेश पाटील, डॉ. पुनम सोलंकी, डॉ. श्रेया चेरडे, डॉ. करिश्मा जयस्वाल व डॉ. स्नेहल अतकरी या डॉक्टरांच्या टीमने नेहावर यशस्वी वैद्यकीय उपचार केले.

कोविडबाधित व मेंदूज्वरासह इतर आजारांची लक्षणे असलेल्या कोमात गेलेली बालिका पूर्णत: बरी झाली आहे. डॉक्टर, पारिचारिका व इतर स्टाफच्या एकत्रित प्रयत्नांतून तिला पुनर्जन्म मिळाला आहे. तिची प्रकृती गंभीर होती. अशा रुग्णांच्या केसेस गुंतागुंतीच्या असतात. तथापि, सर्वांच्या प्रयत्नांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळो, अशी भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी यावेळी व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here