‘फोर्ब्स इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने हा खुलासा केला आहे. राहुल म्हणाला की, ‘विराट कोहलीबरोबर आणि त्याच्या नेतृत्वात खेळताना असे जाणवले की तो वेगळ्याच प्रकारचा कर्णधार आहे. त्याचा स्वभाव अतिशय तापट व्यक्तीसारखा आहे. पण तो 200 टक्के उत्साहाने काम करत असतो. आपण सर्वजण जर आपले 100 टक्के देत असू तर विराट 200 टक्के उत्साहाने कार्यरत असतो.
राहुल पुढे म्हणाला की, “संघातील इतर १० खेळाडूंना प्रेरणा देण्याची आणि त्यांना १०० टक्क्याहून २०० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्याची अद्भुत क्षमता विराटमध्ये आहे. जरी विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांचं जेतेपद जिंकता आलं नसलं तरी गेल्या पाच वर्षात भारतीय संघ कायम अग्रेसर राहिला आहे. तसेच संघाची सामना जिंकण्याची भूकही वाढली आहे. संघातील खेळाडू त्यांच्या तंदुरुस्तीकडे पहिल्यापेक्षा जास्त लक्ष देऊ लागले आहेत. विराटच्या आक्रमक शैली आणि सकारात्मक विचारसरणीमुळे प्रतिस्पर्धी संघांवरील दबाव आपोआप वाढतो.”
कर्णधार असला तरी विराट संघातील सर्व खेळाडूंसोबत मित्रासारखं राहतो तसेच प्रत्येक खेळाडूला त्याचा नैसर्गिक खेळ करण्यासाठी स्वातंत्र्य देतो. त्यामुळे तो इतर कर्णधारांपेक्षा वेगळा वाटतो. माझ्यासाठी विराट नेहमीच सर्वात मोठा आधार राहिला आहे, असंही राहुलचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राहुलने भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीचीही स्तुती केली. तो म्हणाला, जेव्हा कुणी कर्णधार शब्दाचा उच्चार करतो, तेव्हा डोळ्यासमोर नाव येतं ते एम.एस. धोनीचं. त्यांनी देशासाठी अनेक सामने जिंकले आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वात खेळलो आहे. साऊथॅम्प्टन येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनलमध्ये राहुल भारतीय संघाचा भाग होता, पण त्याला संधी मिळू शकली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times