: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी फुरसुंगीतील गंगानगर येथे उघडकीस आला.

तरुणाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटले आहे. स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. रा.गंगानगर, फुरसुंगी) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. सुनिल लोणकर आणि त्यांच्या पत्नी असे दोघेजण हा व्यवसाय पाहतात. तर स्वप्नीलने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. त्यावेळी भाऊ स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यास हॉस्पिटलमध्ये हलवलं. मात्र डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले.

स्वप्नीलसोबत नेमकं काय घडलं?
स्वप्नील एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. करोनामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here