: देशात करोनाविरोधातील लढ्यात कोव्हॅस्किन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लशी लाभदायक ठरल्याने देशभर लसीकरण मोहीम सुरू झाली. १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लशीचे ह्यूमन ट्रायल (Covaxin Human Trial) नागपुरातून झाल्यानंतर या लशीचा मार्ग देशासाठी मोकळा झाला. आता पुढील टप्प्यात लहान मुलांवरील लशीचे ह्यूमन ट्रायल नागपुरात सुरू आहे. मात्र लशीचा पहिला डोस देण्यापूर्वीच झालेल्या स्क्रिनिंगमध्ये जी माहिती समोर आली, त्यानुसार मुलांमध्ये लशीचा पहिला डोस देण्याआधीच अँटीबॉडीज (Corona Antibody) विकसित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मुलांवरील कोव्हॅक्सिन लस ह्यूमन ट्रायलच्या दुसऱ्या फेजमधील २ ते १८ वयोगटातील मुलांमध्येही या अँटीबॉडीज तयार झाल्याची बाब पुढे आली आहे.

मेडिट्रिना रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात लहान मुलांवरील लशीचे ह्यूमन ट्रायल सुरू झाले आहे. ६ जून रोजी पहिल्या टप्प्यातील १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. यानंतर या मुलांना २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात आला. पुढच्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांवरही ह्यूमन ट्रायल सुरू झाली असून ३५ मुलांचे स्क्रिनिंग करून त्यांना लस देण्यात आली. आता २ ते ६ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. या सर्व गटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली आहे.

कालपासून २ ते ६ वयोगटातील मुलांवरील ह्यूमन ट्रायल सुरुवात झाली. यात निवडलेल्या २७ पैकी १३ मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे स्क्रिनिंगमधून स्पष्ट झाले. या वयोगटातील ५० टक्के मुलांमध्ये ॲन्टिबॉडिज आढळल्या. यापूर्वी ६ ते १२ वयोगटातील निवडलेल्या ४३ पैकी १५ मुलांमध्ये तर १२ ते १८ वयोगटातून निवडलेल्या ५१ पैकी १० मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे ज्यांच्या शरीरात अँटिबॉडिज आढळल्या त्यांना व्हॅक्सिनच्या ह्यूमन ट्रायलमधून गाळण्यात आले. सध्या नागपुरात डॉ.आशिष ताजणे आणि डॉ. खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांवरील लशीचे हे ह्यूमन ट्रायल सुरू आहे.

दरम्यान, ‘लशीचा पहिला डोस देण्यापूर्वीच मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाल्याने मुलांना कळत न कळत करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. मात्र त्यांना करोनाचा त्रास झाला नाही. मुलांना विषाणू संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या शरीराने प्रतिकार करत कळत न कळत रोग प्रतिकारशक्तीही विकसित केली,’ असं बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here