नवी दिल्ली : रंगतदार झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आज डेन्मार्कने सर्वांनाच जोरदार धक्का दिला. या करो या मरो सामन्यात डेन्मार्कने चेक प्रजासत्ताकवर विजय साकारला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेन्मार्कचा संघ आक्रमक दिसत होता. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच डेन्मार्कच्या थॉमसने गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर डेन्मार्कच्या खेळात अजून सुधारणा पाहायला मिळाली. त्यांनी गोल करण्याचे एकामागून एक प्रयत्न केले खरे, पण त्यांना यश मिळत नव्हते. चेकच्या संघानेही सामन्यात बरोबरी करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांचे हे प्रयत्न यावेळी अपयशी ठरले. पण मध्यंतरापूर्वीच डेन्मार्कला यावेळी दुसरे यश मिळाले. डेन्मार्कच्या कॅस्परने यावेळी ४२ मिनिटाला दुसरा गोल केला आणि संघाची आघाडी २-० अशी वाढवली. त्यामुळे डेन्मार्क हा सामान जिंकण्याची शक्यता वाढली होती.

डेन्मार्कने २-० अशी बरोबरी साधली असली तरी चेकचा संघ हा शांत बसणार नक्कीच नव्हता. चेकच्या संघातील पॅट्रीकने सामन्याच्या ४९व्या मिनिटाला गोल केला आणि संघाचे खाते उघडून दिले. यावेळी चेक सामन्यात १-२ अशा पिछाडीवर होता. त्यानंतर एक गोल करून चेकचा संघ डेन्मार्कशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. कारण ही बरोबरी केल्यावर त्यांच्या संघाने तमनोबल अजून उंचावले असते. पहिला गोल केल्यावर त्यांच्या खेळात थोडी सुधारणा नक्कीच दिसली. त्यामुळे चेकचा संघ आता सामन्यात बरोबरी करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली होती. पण डेन्मार्कच्या खेळाडूंनी यावेळी त्यांना ही संधी दिली नाही. दुसऱ्या सत्रात चेकचा संघ दुसरा गोल करण्यासाठी धडपडत होता. त्यांनी यावेळी डेन्नार्कवर दुसरा गोल करण्याचे जोरदार प्रयत्नही केले, पण त्यांना दुसरा गोल काही करता आला नाही. त्यामुळेच त्यांना उपांत्यपूर्व फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. डेन्मार्कने यावेळी चेकच्या संघावर २-१ असा विजय साकारत युरा चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here