गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील गुप्त भेटींचे सत्र सुरू आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदीसुद्धा फोनवरून सहभागी झाल्याचे समजते. असं असतानाच संजय राऊत व आशिष शेलार यांच्या भेटीमुळं पुन्हा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप येणार का?, अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवर भाष्य करत भाजप शिवसेनेसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
वाचाः
‘भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,’ असं सूचक विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राऊत- शेलार चांगले मित्र
‘राजकारणात अशा भेटी होतात. राऊत आणि शेलार चांगले मित्र आहेत. शिवसेनेने हात पुढे करण्याचा काही विषय नाही आणि तशी शक्यताही नाही,’ असे या भेटीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
वाचाः
पटोले निर्धास्त
राऊत आणि शेलार यांच्या भेटीचे वृत्त समोर आल्यानंतर स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘सरकार वाचविण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्षे चालेल,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times