: करोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जम्बो कोविड सेंटर तसेच इतर सोयीसुविधा उभारण्यात आल्या. दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात त्या कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या लाटेबाबाबत इशारे दिले जात असताना काही करोनाकेंद्रांतील महत्त्वाच्या सेवा खासगी रुग्णालयांकडे देण्याची चाचपणी पालिकेने सुरू केली आहे. त्यात प्रामुख्याने आयसीयू तसेच ऑक्सिजन खाटांच्या नियोजनाचा समावेश असण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही करोनाकेंद्रांत खासगी संस्थांची मदत घेण्यात येत आहेच; मात्र आता थेट खासगी रुग्णालयांचीच मदत घेण्यासाठी पालिका पावले टाकीत आहे.

पालिका रुग्णालयांमध्ये करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांसाठीही उपचारांची सुविधा सुरू राहावी, यासाठी पालिकेने जम्बो तसेच इतर करोना उपचारकेंद्रांची मुंबईमध्ये सुरुवात केली. पुढील तीन महिन्यांसाठी बीकेसी जम्बो, दहिसर, सोमय्या, कांजूरमार्ग, मालाड करोना केंद्रामधील प्रौढ तसेच लहान मुलांचा आयसीयू, ऑक्सिजन असलेल्या खाटा, डायलेसिस, ट्रायेज विभाग सांभाळण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळाची गरज लागणार आहे. बीकेसी जम्बोमधील १०८, दहिसर केंद्रातील १००, सोमय्यामधील २००, कांजूरमार्गमधील १५०, मालाड करोना उपचारकेंद्रांतील १९० आयसीयू खाटांच्या नियोजनासाठी खासगी रुग्णालय वा वैद्यकीय संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. दहिसर, सोमय्या, कांजूरमार्ग आणि मालाड येथे ऑक्सिजनची गरज असलेल्या खाटांची संख्या ही अनुक्रमे ११७, ३००, ७५०, १२०० आणि १५३६ असून या खाटांची वैद्यकीय निगराणी करण्यासाठी खासगी संस्था तसेच रुग्णालयांची वैद्यकीय सेवा घेण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. सोमय्या तसेच कांजूरमार्ग येथील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये प्रत्येकी पन्नास खाटांसाठी ही गरज आहे. तर डायलेसिसच्या २० ट्रायेज विभागासाठी ४० खाटांचे नियोजन पाहणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रुग्णालयाने आयसीयू, बिगर आयसीयू, ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन नसलेल्या रुग्णांसाठी २४ तासांसाठी कुशल वैद्यकीय सेवा देणे अपेक्षित आहे.

काय असेल व्यवस्था?

१० खाटांच्या आयसीयू कक्षासाठी प्रतिदिवशी प्रत्येक एकेक वरिष्ठ व सहाय्यक सल्लागार, ६ आरएमओ, १० परिचारिका, ८ मदतनीस, दोन तंत्रज्ञांची गरज भासणार आहे. पाळ्यांच्या स्वरूपामध्ये आयसीयू कक्षाचे नियोजन पाहावे लागेल. विमा, जेवण, वाहतूक या सुविधा संबधितांनी देणे अपेक्षित आहे. आयसीयू व्यवस्थापन पाहण्यासाठी जैववैद्यकीय अभियंता असणे आवश्यक असून साधनसामग्री, औषधे ही पालिकेकडून देण्यात येतील. एजन्सी वा रुग्णालयाने रुग्णांची काळजी घ्यायची आहे.

असे असतील दर

आयसीयू खाटेसाठी प्रतिदिन सहा हजार, ऑक्सिजन खाटेसाठी १५०० तर ऑक्सिजन नसलेल्या खाटांसाठी ८०० रुपये दर निर्धारित करण्यात आले आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी खासगी एजन्सी तसेच रुग्णालयांनाही यात सहभाग घेता येईल, असे सांगितले. यासाठी समाधानाकारक प्रतिसाद आला आहे. तिसरी लाट मोठी आल्यास रुग्णांना तप्तरतेने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून पालिकेने विविध पर्यायांवर विचार केला आहे. त्यातील हा एक पर्याय आहे. गरज पडल्यास या पर्यायाचा वापर करण्यात येईल.

तीन हजार मनुष्यबळाची गरज

आयसीयू चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसल्याचे यापूर्वी आलेल्या करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये दिसून आले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि त्या तुलनेत कमी असलेल्या मनुष्यबळाच्या समस्येवर उतारा काढण्यासाठी पालिकेला आयसीयूमध्ये तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय मदतनीस, वॉर्डमधील अशी अडीच ते तीन हजार कुशल मनुष्यबळाची गरज आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here