फळविक्रेत्याकडे जाऊन रोज खाणे येथील एका तरुणाच्या जिवावर बेतले. याच कारणावरून झालेल्या वादातून आणि त्याच्या साथीदाराने केलेल्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. अमोल सुरडकर (३०) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या चार तासांत सचिन सिंग आणि जितेंद्र ऊर्फ प्राण यांना अटक केली.
पवईच्या गोखलेनगरमध्ये दोन तरुणांनी एकाची हत्या केल्याची माहिती मध्यरात्री पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयातून मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक दिलीप धामुणसे यांच्यासह पोलिसांची पथके रुग्णालय आणि घटनास्थळी रवाना झाली. चौकशीत मृत व्यक्तीचे नाव अमोल सुरडकर असून, तो झोमोटोमध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचे समजले. याच परिसरात फळविक्रीची गाडी लावणाऱ्या सचिनशी त्याचा वाद झाला व सचिनने मित्र जितेंद्र याला सोबत घेऊन अमोलवर चाकूहल्ला केल्याची माहिती मिळाली. मात्र हल्ल्यांनंतर दोघेही गायब होते.
सचिन मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याने तो गावी पळण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे कुर्ला आणि कल्याण या ठिकाणी पोलिसांची पथके पाठवण्यात आली. कुर्ला येथून उत्तर प्रदेशात पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिनला पकडण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार जितेंद्रलाही अटक करण्यात आली. अमोल हा गाडीवर येऊन पैसे न देताच फळे खायचा व मित्रानांही द्यायचा. पैसे मागितल्यास गाडी लावायला देणार नाही, असे धमकावायचा. यावरून झालेल्या वादातून हा हल्ला केल्याचे दोघांच्या चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times