भाजपचे दोन खासदार, सात आमदार, ४९ नगरसेवक, ३ माजी आमदार आणि १०-१२ मराठा सदृश्य संघटनांचा पाठिंब्यांवर हा मोर्चा निघाला. त्यामुळे आजच्या मोर्चाची गर्दी फक्त हजारांत होती. या मोर्चाची सुरूवातच मुळात पोलिसांच्या प्रतिबंधाने झाली. त्यामुळं आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवातीला टेंभुर्णीत रास्ता रोको केले.
यानंतर पंढरपूर-मंगळवेढ्याचे नूतन आमदार समाधान आवताडे यांना तिऱ्हे येथे अडविण्यात आले. यावेळी त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली. तर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे रुग्णाची वेशभूषा करून आंदोलन स्थळी अवतरले. अशा प्रकारे या मोर्चाच्या निमित्ताने कधी नव्हे ते खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धयेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी त्याचबरोबर भाजपच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक असे भाजपचेचं नेते मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निघालेला हा मोर्चा मराठा समाजाचा कमी अन् भाजपचा जास्त असाच पहायला मिळाला. कारण, या मोर्चात फक्त भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीच जास्त गर्दी होती. इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळं या मोर्चावर आता पक्षीय शिक्का बसला आहे.
सकल मराठा समजाच्यावतीने यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चावेळी राजकीय पुढाऱ्यांना सर्वात शेवटी ठेवण्यात आलं होतं. शिवाय सर्व समाज एक समांतर होता. ती स्थिती आजच्या मोर्चात नव्हती. त्यामुळे हा मोर्चा मराठा समाजाचा की भाजपचा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times