हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. सात आणि आठ जुलै रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस सामान्यदेखील असू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये या दोन्ही दिवशी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी आणि दुबार पेरणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे.
९ जुलैनंतर कोकणात जोर वाढणार
पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times