काही महिन्यांपूर्वीच त्यांना करोनाची बाधा झाली होती. मात्र, करोनावर यशस्वीपणे त्यांनी मात केली होती. महेंद्र सिंह यांनी इंजिनिअरिंगचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी काही काळ डोंबिवलीतील कारखान्यात त्यांनी नोकरी केली. पण स्वतःच्याच कारखान्यात त्यांनी कामगारांची युनियन स्थापन केल्यामुळे मालकांनी त्यांची कलकत्त्याला बदली केली. तेथे माकप बळकट असल्यामुळे ते जास्तच प्रभावित झाले आणि नोकरी सोडून मुंबईत येऊन १९७१ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ही डावी युवा संघटना स्थापन करून तिच्या कामास सुरुवात केली. तसेच १९७० साली नुकत्याच स्थापन झालेल्या ‘सीटू’च्या झेंड्याखाली त्यांनी ट्रेड युनियनचे काम सुरू केले. दिवंगत कामगार नेते व गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक के. एल. बजाज, ज्येष्ठ कामगार नेते अशोक बॅनर्जी, राधाकृष्ण मेनन, एम. व्ही. गोपालन, पी. एम. वर्तक व इतर सहकाऱ्यांसोबत अनेक कारखान्यांत त्यांनी सीटू संलग्न युनियन्स स्थापन केल्या होत्या.
१९७०च्या दशकात कम्युनिस्ट नेत्यांवर, चळवळीवर होणाऱ्या शिवसेनेच्या हल्ल्याविरोधात व त्यानंतर काँग्रेसच्या केंद्र सरकारच्या आणीबाणीच्या हल्ल्याविरोधात माकपच्या लढ्यात महेंद्र सिंह यांचे महत्त्वाचे योगदान होते. महेंद्र सिंह यांच्यावर १९८५ साली अरिस्टोक्राट कंपनीच्या मालकांच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. अनेक दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. माकपच्या मुंबई सचिवपदी महेंद्र सिंह यांची १९९४ साली निवड करण्यात आली. त्यांनी २०१५ पर्यंत ही जबाबदारी पार पाडली. डावी चळवळ क्षीण होत असताना मुंबईत माकप व जनसंघटनांचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वर्ष २०१५ साली विशाखापट्टनमच्या राष्ट्रीय अधिवेशनात माकपच्या केंद्रीय कमिटीवर त्यांची निवड झाली होती.
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या डाव्या विचारांच्या युवक संघटनेचे १९८६ साली मुंबईत पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले. त्यात संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष म्हणून डॉ. विठ्ठल मोरे आणि संस्थापक राज्य सरचिटणीस म्हणून महेंद्र सिंह यांची निवड झाली होती.
साधी राहणी, कडवी तत्त्वनिष्ठा, जबाबदारीची तीव्र जाणीव, कष्ट घेण्याची तयारी, अत्यंत प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, आणि वरून कडक दिसणारा पण आतून प्रेमळ असणारा स्वभाव असणारे महेंद्र सिंह हे सच्चे कम्युनिस्ट नेते होते. त्यांच्या निधनाने पक्षाची व कामगार चळवळीची हानी झाली असल्याची शोक प्रतिक्रिया माकपचे राज्य सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली आहे. यांच्या निधनावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व इतर डाव्या-पुरोगामी पक्ष संघटनांनी शोक व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times