पटेल हे फोर्ट मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या पटेल यांचं फोर्टमधील सिधवा रोडवर वाइन शॉप आहे. गेल्या आठवड्यात पांढऱ्या कपड्यातील काही लोक त्यांच्या दुकानात आले. आम्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहोत असं सांगून त्यांच्याकडं लायसन्स व अन्य कागदपत्रं मागू लागले. महिन्याला सात लाख रुपये हप्ता आणि काही बॉटल वाइनची मागणीही त्यांनी केली. पटेल यांनी त्यांच्याशी तडजोडीची तयारी दर्शवली आणि मंगळवारी अंतिम बोलणीसाठी बोलावले. त्या दरम्यान पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना माहिती दिली. मंगळवारी ठरल्याप्रमाणे एक जण दुकानात आला. त्यांना पटेल यांनी बोलण्यात गुंतवून ठेवलं. तोपर्यंत त्यांच्या मुलानं बाहेर जाऊन दुकानाचा दरवाजा लावला आणि खंडणीबहाद्दर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजेंद्र वाघमारे असं त्याचं नाव असून तो दादरचा रहिवासी आहे. त्याचे तीन साथीदार संजय अहिरे, जनार्दन ग्यानीत आणि मनीष तांबे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे अन्य दुकानदारांकडूनही खंडणी वसूल करत असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
मूळचे भूजचे रहिवासी असलेले पटेल हे कायद्यावर बोट ठेवून चालणारे गृहस्थ आहेत. कायदा मोडणाऱ्यांना ते नेहमीच विरोध करतात. आतापर्यंत त्यांनी १२१ खंडणीबहाद्दरांना पोलिसांच्या हवाली केलं आहे. त्यासाठी त्यांना १०० हून अधिक सरकारी पुरस्कार व प्रमाणपत्रं मिळाली आहेत. त्यांनी अद्दल घडवलेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक, आयकर खाते, महापालिका, अग्निशमन दल, रेल्वे पोलीस दल, म्हाडा व अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेकांचा समावेश आहे.
‘महिन्याला ७ लाख रुपये हप्ता आणि वाइनच्या बॉटल हे चौघे माझ्याकडं मागत होते. मी एक प्रामाणिक करदाता आहे. कधी कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही. मग मी यांना पैसे का द्यायचे,’ असा प्रश्न पटेल करतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times