मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील (Bhima Koregaon Violence) सर्वाधिक वयाचे आरोपी (८४) यांचं वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात निधन ( Passed Away) झालं आहे. स्वामी यांचं आज दुपारी १.३५ वाजता निधन झालं. मुंबई हायकोर्टातील सुनावणीदरम्यानच होली फॅमिली रुग्णालयातील डॉ. डिसूझा यांनी न्यायमूर्ती संभाजी शिदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाला याबाबत माहिती दिली.

‘स्टॅन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, उपचार केले,’ अशी माहिती डॉ. डिसूझा यांनी मुंबई हायकोर्टाला दिली आहे. त्यानंतर स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त खंडपीठाने म्हटलं की, ‘आम्हाला या बातमीने अत्यंत दु:ख झालं आहे. आम्हाला सांत्वन करण्यासाठी शब्द नाहीत.’

‘या ३ यंत्रणांनी केला हलगर्जीपणा’
‘नवी मुंबईतील तळोजा रुग्णालयात असताना स्वामी यांना तीनदा रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना करोनाची लागणही झाली. त्यामुळे तळोजा तुरुंग प्रशासन, राज्य सरकार आणि एनआयएने त्यांच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा केला,’ असा आरोप स्वामी यांचे वकील अॅड. मिहिर देसाई यांनी केला आहे. तसंच मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम व्हायला हवे, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

दरम्यान, एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनीही अतीव दु:ख व्यक्त केलं आणि त्याचवेळी अॅड. देसाई यांनी लावलेले आरोप योग्य नसल्याचं म्हणणं मांडलं आहे. मात्र असे सर्व युक्तिवाद, म्हणणे मांडण्याची आता ही वेळ नाही, असं सांगून खंडपीठाने दोघांनाही थांबवलं.

स्वामी यांना नेमका कोणता आजारा झाला?
‘स्टॅन स्वामी यांना कल्मनरी इन्फेक्शन झाले होते. त्याशिवाय न्यूमोनियाही झाला होता. तसंच पार्किन्सन्सचा त्यांचा आजार जुनाच होता. त्यामुळे मृत्यूचे कारण काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. परिणामी पोस्टमॉर्टम न करताच मृत्यूचा दाखला दिला जाऊ शकतो, असं आमचे मत आहे,’ असं होली फॅमिली रुग्णालयाचे डॉक्टर इयान डिसूझा यांनी खंडपीठासमोर आपलं म्हणणं मांडलं आहे.

‘फादर स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती धर्मगुरू होते. त्यांचे कुटुंब नाही. त्यामुळे सेंट झेवियर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेन्हास यांच्याकडे त्यांचा पार्थिव देह देण्यात यावा,’ अशी विनंती अॅड. देसाई यांनी केली.

‘हा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाल्याने शवविच्छेदन अहवाल आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम १७६ प्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी आवश्यक ठरेल,’ अशी भूमिका देसाई व मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मांडली आहे. मात्र ‘शवविच्छेदन आजच करण्यात यावे. त्यानंतर फौजदारी दंड संहितेन्वये आवश्यक चौकशी व अन्य कायदेशीर पालन करावे. त्यानंतर मुंबईत करोना आपत्ती काळातील प्रमाणिक कार्यप्रणालीप्रमाणे दिवंगत फादर स्टॅन स्वामी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यादृष्टीने पार्थिव देह फादर फ्रेझर यांच्या ताब्यात देण्यात यावा,’ असे निर्देश खंडपीठाने तुरुंग प्रशासन व राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, पुढील मंगळवारी याविषयी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी तळोजा तुरुंग प्रशासनाने स्वामी यांच्यावरील वैद्यकीय उपचारांविषयीचे सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावेत, असंही खंडपीठाने म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here