विधानसभा सभागृहात तसंच अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याप्रकरणी व गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना आज निलंबित करण्यात आलं. त्यात आशिष शेलार यांचाही समावेश आहे. त्याबाबत बोलताना शेलार यांनी आपली बाजू मांडली. ‘हे सरकार तालिबानी वृत्तीचे आहे,’ असा घणाघातही त्यांनी केला.
वाचा:
‘विधानसभेत जेव्हा छगन भुजबळ यांनी ओबीसींचा ठराव मांडला, त्यावेळी त्यातील त्रुटी दाखवून ओबीसी समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून मी हरकतीचा मुद्दा मांडून बोलू इच्छित होतो. पण त्यावर मला बोलू दिलं नाही. छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या विधानाला मी हरकत घेतली होती. तेव्हाही मला बोलू दिलं नाही. पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी गैरसमज पसरवणारी विधाने मंत्र्यांनी केली आहेत, ती कामकाजात राहू नये ही बाब लक्षात आणून देण्यासाठी बोलू द्या, अशी मागणी मी वारंवार करीत होतो. पण मला बोलू न देता लोकशाहीचा गळा घोटला गेला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या पटलावर येत होत्या, त्यामुळं भाजपचे काही आमदार आक्रमक झाले. ‘आम्हाला बोलू द्या’ अशी मागणी करीत अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले. त्यांना मागे घेण्यासाठी मी गेलो होतो, हे सभागृहात सर्वांनी पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात सुद्धा आम्हाला बोलू द्या अशी मागणी आमदार करीत होते. पण त्यांचं म्हणणं ऐकलं गेलं नाही. आम्ही कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. पण तालिका अध्यक्षांना शिविगाळ केली असं केवळ वाटल्यानं तेच ग्राह्य धरून आम्हाला निलंबित केलं गेलं,’ असं शेलार म्हणाले.
‘माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेत नाही. त्यामुळं त्यांनी ‘नो बॉल’वर माझी विकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी क्रिकेट खेळणारा आहे, आता दोन्ही हातांनी बॉलिंग टाकेन आणि सभागृहाबाहेर तुमची पळता भुई थोडी करून टाकेन,’ असा इशारा शेलार यांनी दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times