‘विरोधी आमदारांना बोलण्याची संधी न देता सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत लोकशाहीच्या सभागृहातच लोकशाहीचा गळा घोटला. आमच्याकडून कोणतीही शिवीगाळ अथवा धक्काबुक्की करण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्हाला ही कारवाई मान्य नाही,’ अशा शब्दांत भाजपच्या निलंबित १२ आमदारांनी राज्यपालांसमोर भूमिका मांडली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर आपली बाजू मांडत असताना या विषयाचा संपूर्ण अहवाल मागवण्यात यावा. तसंच या प्रकरणी आपण सरकारला योग्य समज व सूचना द्यावी आणि लोकशाही मुल्यांची होणारी गळचेपी रोखावी, अशी मागणी निलंबित आमदारांनी राज्यपालांकडे केली.
दरम्यान, राज्यपाल भेटीविषयी निलंबित आमदारांमध्ये समावेश असणाऱ्या अतुल भातखळकर यांनी माहिती दिली आहे. ‘OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांचा आवाज दडपण्यासाठी वसूली सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले. या दंडेली विरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची राजभवन येथे भेट घेतली,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
कोणत्या १२ आमदारांचं निलंबन
झालं?
तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या १२ विधानसभा सदस्यांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. यामध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times