भारताची मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह यांची ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी सुरुवात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते दोघे भारतीय पथकाचे नेतृत्व करतील. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया हा ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका निभावणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने याची घोषणा केली. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताचे दोन ध्वजवाहक (एक पुरुष आणि एक महिला) असणार आहेत. लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी ही माहिती दिली. ऑलिम्पिमध्ये भारताचा ध्वजवाहक होणे ही एक मानाची संधी समजली जाते आणि ही संधी आता मेरीला मिळाली आहे.
भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहक होता. कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शंभरहून अधिक भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी मेरी कोम ही एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने ५१ किलो फ्लायवेट प्रकारात कांस्यपदक जिंकले. जागतिक स्पर्धेत सर्वाधिक पदके (६ सुवर्ण + एक रौप्य + एक कांस्य) जिंकण्याचा विक्रम मेरी कोमच्या नावावर आहे. याबाबतीत क्युबाच्या फेलिक्स सॅव्हनला तिने मागे टाकले आहे. फेलिक्सने आतापर्यंत ७ पदके जिंकली होती. आशिया / ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता गटातील उपांत्य फेरी गाठून मेरीने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली. दुसर्या मानांकित मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या आयरिश मॅग्नोवर ५-० असा विजय नोंदवत आपले दुसरे ऑलिम्पिक तिकीट पक्के केले. सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकीर्दीचा शेवट गोड करण्याचा मेरीचा प्रयत्न असणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times