: ग्रामीण भागातील एक विद्यार्थी दहावी, बारावीला चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरात गेला. मात्र, या तरुणाला परिस्थितीपुढे गुडघे टेकत आपली स्वप्न गुंडाळावी लागली. पुढे त्याने मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत उपेक्षित वर्गातील मुलांसाठी एकलव्य स्पर्धा परीक्षा नावाने अ‍ॅकॅडमी सुरू केली. त्यानंतर मात्र १० वर्षांच्या संघर्षानंतर दिवसरात्र घेतलेल्या परिश्रमाला फळ आलं आणि पुणे रिटर्न म्हणून हिणवल्या जाणार्‍या विद्यार्थ्याची उच्च शिक्षणासाठी थेट लंडन विद्यापीठात निवड करण्यात आली आहे.

राजू आत्माराम केंद्रे असं या होतकरू व जिद्दी विद्यार्थ्याचं नाव आहे. मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील प्रिंप्री (खंदारे) या गावातील रहिवासी असला तरी यवतमाळ ही त्याच्या पंखाला भरारी देणारी भूमी ठरली आहे. राजूला दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले. डॉक्टर होऊन समाजसेवेला वाहून घेण्याचे स्वप्न बघितले असताना ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे पुस्तक वाचनात आले आणि एका नव्या जिद्दीने झपाटले.

प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगून राजू केंद्रे याने पुणे गाठले. मात्र, त्या ठिकाणी आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने त्याने पुन्हा आपले गाव गाठले. फेलोशिपदरम्यान राजूने यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात येणार्‍या पारधीबेड्यावर काम केलं.

राज्य सरकारने शॉर्ट फिल्म बनवून राजूच्या कामाची दखल घेतली. प्रसिद्धीचे वलय निर्माण होत असताना त्याची दिशा भरकटली नाही. गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संकलन मोहीमही राबविली. यवतमाळमध्ये सावित्री ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करीत असताना एकलव्य महाराष्ट्र नावाने एक शैक्षणिक चळवळ सुरू केली. मागील तीन वर्षांत एकलव्यचे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. या तरुणाला आता ब्रिटिश सरकारची चेवनिंग शिष्यवृत्ती मिळाली आहे. जगातील १६० देशातील युवांना नेतृत्व करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. ६३ हजार युवकांमधून राजू केंद्रेची निवड झाली आहे. विदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याच मायभूमीत येऊन काम करायचे, असेही त्याने ठरविले आहे.

‘जिल्हा परिषद आणि मुक्त विद्यापीठ मधून मी शिक्षण घेतलं आहे. शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान आहे. शिष्यवृत्ती मिळाल्याने १८ विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. माझा युकेपर्यंतचा प्रवास सर्व फस्ट जनरेशन लर्नरला नक्कीच प्रेरणादायी आहे. ती त्यांनाच समर्पीत करतो. ही स्कॉलरशिप एकलव्यच्या शैक्षणिक चळवळीचा पाया असणार आहे. बहुजन, उपेक्षित समाजातील मुले शिकली पाहिजे, यासाठीच माझा पुढेही प्रयत्न राहील,’ असं राजू केंद्रे यानं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here