म. टा. वृत्तसेवा,

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणारे नागरिक आधीच धास्तावलेले असताना, त्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारकडे निधी नसल्याने रहिवाशांनीच इमारतींचा पुनर्विकास करण्याचा सल्ला देणारे गृहनिर्माण मंत्री यांच्या विरोधात स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विरोधात शिवसेना शहर प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली आहे. पालकमंत्री शहरात पुनर्विकासासाठी आश्वासन आणि निधी देत असताना, आव्हाडांच्या भेटीनंतर मात्र रहिवाशांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

धोकादायक इमारतींचा प्रश्न उल्हासनगरमध्ये गाजत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी शहरात भेट दिली होती. मात्र या बैठकीत प्रशासन आणि महापौरांना आमंत्रित केले नव्हते. त्यात उपस्थित रहिवाशांना गृहनिर्माण मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा असताना, आव्हाड यांनी मात्र सरकारच्या आर्थिक स्थितीचेच रडगाणे रहिवाशांसमोर मांडत, सरकारकडे पैसे नसल्याने रहिवाशांनाच इमारतींचा पुनर्विकास करण्याचा सल्ला दिला. दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील धोकादायक इमारतींचे लेखापरीक्षण, पुनर्विकास, ‘टाटा आमंत्रण’मधील तात्पुरता रहिवास आणि संक्रमण शिबिरांबाबत अनेक आश्वासने दिली होती. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या विशेष महासभेत या विषयांचा ठरावही पारित करण्यात आला होता. तर, दुसरीकडे गृहनिर्माण मंत्र्यांच्या भेटीमुळे रहिवाशांमध्ये भीती आणि धोकादायक इमारतींबाबत संभ्रम निर्माण केल्याने जिल्हा पातळीवरील शिवसेनेचे नेते आणि स्थानिक नेत्यांनी आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्या वक्तव्याला खोडून काढले आहे. पालकमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी आणि धोकादायक इमारतींसाठी राज्य सरकार आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून मुबलक निधी उपलब्ध केला जात असल्याचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. तर, मंत्री आव्हाड यांनी शहरात येण्यापूर्वी अभ्यास करत वक्तव्य करण्याची गरज असल्याचाही टोला नगरसेवक अरूण आशान यांनी लावला आहे.

स्थानिक पातळीवरही समन्वय गरजेचाच
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार योग्य तो समन्वय साधत कारभार करत आहे. मात्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींबाबत महापौर, आयुक्त आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच, चुकीची वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मंत्र्यांविरोधात नागरिकांसह शिवसेनेमध्येही नाराजी आहे. शहरातील विषयांबाबत समन्वय साधण्याची गरज असल्याचे यावेळी धनंजय बोडारे यांनी सांगितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here