मुंबई : विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांसमोर येत कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी सभागृहात झालेल्या वादंगावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांकडून विधानसभेचा अवमान करण्यात आला, अशी घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे.

‘सभागृहाचं आजपर्यंत पावित्र्य राखण्यात आलं, मात्र काल विरोधकांकडून विधानसभेचा अपमान करण्यात आला. आमदारांचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी खूप संयम ठेवला. उपाध्यक्षांच्या दालनात तर भाजपच्या काही सदस्यांनी भास्कर जाधव यांना धक्काबुक्कीही केली. या घटनेचा व्हिडिओ पाहून सर्वांचीच मान शरमेनं खाली गेली. कालचा गोंधळ कमी होता म्हणून की काय आज तर भाजपने विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभाच भरवली. इतक्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आम्हाला पहिल्यांदाच असा अनुभव आला,’ असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला फटकारलं आहे.

विधानसभेत कोणते महत्त्वपूर्ण ठराव झाले? अजित पवारांनी दिली माहिती
– केंद्राकडून राज्याला महिन्याला करोना लशीचे ३ कोटी डोस देण्यात यावेत, याबाबत विधाानसभेत ठराव

– मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याविषयीही विविध ठराव

– एमपीएससीच्या १५ हजाराहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार

– एपीएससी आयोगावर ६ सदस्यांची नेमणूक होणार

– केंद्राकडून राज्याचे ३० हजार कोटी रुपये येणे बाकी

शेतकरी विधेयकांवर उत्तर
‘केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांवर अनेकांना आक्षेप आहे. त्यामुळे या कायद्यांमध्ये सुधारणा करून राज्याने हे विधयेक सर्वांसमोर मांडलं आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी २ महिन्यांची वेळही ठेवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येईल, असा एकही निर्णय घेतला जाणार नाही,’ असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here