ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पाठिंबा जाहीर करण्याचे त्यांना चिअर करण्याचे आवाहन सचिनने भारतीयांना केले आहे. सचिनने आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले आहे की, विजय आणि पराभव यातील फरक खूप कमी असतो. पण तरीही त्यासाठी आपले खेळाडू वर्षानुवर्षे मेहनत घेतात. ऑलिम्पिकमध्ये खेळणे प्रत्येक अॅथलीटचे स्वप्न असते. या खेळाडूंनी घेतलेल्या परिश्रमांना मी सलाम करतो. ‘लेट्स चीअर इंडिया’. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा आम्ही तुम्हाला तिरंग्याचे प्रतिनिधित्व करताना पाहतो, तेव्हा आमच्या अंगावर रोमांच उठतात. हे ऑलिम्पिक काही वेगळे असणार नाही. आम्ही सर्व भारतीय तुमच्यासाठी घोषणा देऊ कारण तुम्ही आम्हाला गौरवान्वित करत आहात.
सहा वेळा विश्वविजेती आणि लंडन ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती मुष्टियोद्धा एम.सी. मेरी कोम आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह 23 जुलै रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. तो समारोप समारंभावेळी भारतीय ध्वजवाहकाची भूमिका साकारणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (IOA) आयोजन समितीला याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये भारताचे दोन ध्वजवाहक असण्याची ही पहिलीच वेळ आहे. लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी आयओएचे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी हा निर्णय घेतला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times