नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा बुधवारी ४० वा वाढदिवस. पण आजपासूनच धोनी सोशल मीडियात ट्रेंडिंग आहे. भारतात साउथ इंडियन चित्रपटातील अभिनेत्यांनंतर वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशीपासून ट्रेंडमध्ये येणारा धोनी हा पहिला क्रिकेटपटू. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूने एक भविष्यवाणी केली असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.

एम.एस.धोनीला संघात रिटेन जरी केलं नाही तरी भविष्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूनं केली आहे. दिग्गज फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगला धोनी चा प्रशिक्षक होईल, असं वाटतं. तसेच त्याने धोनीला महाराजा ही उपाधीही दिली आहे. धोनी सीएसके फ्रँचायझी कधीच सोडणार नाही, असा दावाही हॉगने केला आहे. येत्या काही दिवसांत आयपीएल २०२२चा लिलाव होणार आहे. मेगा लिलावापूर्वी सीएसकेनं धोनीला रिटेन केलं नाही, तर धोनीचं काय होईल, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. या पार्श्वभूमीवर हॉगने ही भविष्यवाणी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रँचायझी तीन परदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायमस्वरुपी ठेवू शकते. यानंतर ट्विटरवर कोणते खेळाडू संघात कायम राहतील याबाबत चर्चांना उधाण आले होते. चेन्नई संघ कोणते खेळाडू कायम ठेवू शकते याबाबतही चर्चा झाली.

आयपीएल सुरू झाल्यापासून धोनी चेन्नई संघाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आगामी लिलावात धोनीच्या भवितव्याविषयी अटकळ सुरू झाली आहे. आयपीएलच्या नव्या नियमांनुसार धोनी संघात कायम राहिल्यास चेन्नईला १२.५ ते १५ कोटी रुपये मोजावे लागतील.

7 जुलै 2021 रोजी धोनी 40 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी इतका पैसा खर्च करण्याबाबत संघ व्यवस्थापन विचार करेल. धोनीच्या कर्णधारपदाबाबत कोणताच प्रश्न उद्भवत नसला तरी गेल्या दोन हंगामात फलंदाज म्हणून त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अनेक अनुमान काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षात तो आपल्याला प्रशिक्षकाच्या भूमिकेतही दिसू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here