विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले होते. त्यानंतर राज्यपालांनीही या निवडणूकीविषयी पत्रव्यवहार करून, मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली होती. मात्र, करोनाची परिस्थिती असल्याने निवडणूक घेता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन दिवसीय अधिवेशनात राज्याच्या हिताचे एवढे काम करणारे हे राज्यातील पहिले सरकार आहे. त्याबाबत आम्ही विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानतो, तसेच ज्यांच्याकडून जे घडू नये ते घडले त्यांना सुधारण्यासाठी मी शुभेच्छा देतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आकडेवारीवर प्रश्नचिन्ह
‘केंद्र सरकारकडे २०११च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी आहे. ती आम्हाला मिळावी अशी मागणी होती. त्याच मागणीसाठी अधिकृत ठराव विधानसभा अधिवेशनात आणला होता. त्यात चुकीचे काय आहे? यात इतक्या मिरच्या झोंबण्यासारखं काय आहे? केंद्राच्या सर्वेक्षणात आठ लाख चुका असल्याचा दावा करता, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? या योजनेत घोटाळा आहे, असे म्हणायचे का,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
विधिमंडळाचे सूप वाजले
करोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. करोना संसर्गामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलै असे दोन दिवस झाले. या दोन दिवसांत विधानसभेचे १० तास १० मिनिटे कामकाज झाले. कामकाजाचा एक तास २५ मिनिटांचा वेळ वाया गेला. सभागृहात १२ विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी नऊ विधेयके मंजूर झाली. याशिवाय चार शासकीय ठराव मंजूर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times