म. टा. वृत्तसेवा, पनवेलः ‘पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी लसीकरण केंद्रात मुंबईतील एका संस्थेकडून लस उपलब्ध केली जाणार आहे, शक्य असेल त्या नागरिकांनी या खासगी लसीकरण केंद्रातून लस घ्यावी,’ असे अजब आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर एक दिवस लसीकरण होते आणि चार दिवस ते बंद राहते. यामुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.
सद्य परिस्थितीत करोना साथरोगावर लसीकरण हा एकमेव उपाय मानला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून १८ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पनवेल महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्यामुळे केंद्र सुरू असण्यापेक्षा जास्त काळ बंद असतात. पहाटेपासून रांग लावणाऱ्या नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागते. लशींचा तुटवडा असल्याने केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी मुंबईतील एका नामांकित संस्थेशी समन्वय साधून पनवेल महानगरपालिकेने ज्या रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे, अशा रुग्णालयांना लशींचा साठा प्राप्त करून देण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
खासगी केंद्रांवर कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक अशा तिन्ही प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महापालिकेने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ६१ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यातील ११ खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू आहे. मात्र मोफत लस मिळावी म्हणून सर्वसामान्य नागरिक महापालिकेच्या केंद्रांवर गर्दी करीत असताना महापालिकेने शक्य असेल तर खासगी लसीकरण केंद्रांवर लस घ्यावी, असे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आयुक्तांच्या शिफारसीमुळे खासगी केंद्रांवर लस उपलब्ध होणार असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. नागरिक लस घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु लस मिळत नाही, मात्र खासगी केंद्र सुरू ठेवत असताना महापालिकेची केंद्रे सुरू राहून समाजातील सर्व घटकांना लस उपलब्ध होईल, सर्वांना लस घेऊन करोनापासून सुरक्षित राहता येईल, यासाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ खासगी लसीकरण करून महापालिकेची केंद्रे बंद, असा प्रकार महापालिकेने करू नये.
– रामदास शेवाळे, शिवसेना, महानगरप्रमुख
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times