डी. बी. वाळूंज (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने हा प्रकार उघडकीस आणला आहे. ते संगमनेर येथील विधी महाविद्यायात शिक्षण घेत आहेत. कामानिमित्त ३० मे २०२१ रोजी वाळूंज संगमनेरला आले होते. त्यावेळी संगमनेर पोलिसांनी त्यांना टोलनाक्यावर थांबवून दोनशे रुपयांची पावती दिली. सोशल डिस्टन्सिंगचा भंग केल्यासंबंधी दंड वसूल केल्याचा पावतीवर उल्लेख आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांचा शिक्का आणि सही असलेली ही पावती वाळूंज यांना देण्यात आली. मात्र, या पावतीवरून वाळुंज यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पावती पुस्तकासंबंधी माहिती मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात माहितीच्या अधिकारात अर्ज केला. पावतीवर असलेल्या नंबरच्या अधारे त्या क्रमांकाच्या पुस्तकातील शंभर पावत्यांच्या झेरॉक्स प्रती मिळाव्यात, अशी मागणी वाळूंज यांनी केली. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक तथा जनमाहिती अधिकारी पांडुरंग पवार यांनी त्यांना उत्तर दिले आहे. संबंधित पावतीपुस्तक पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर उपलब्ध नसल्याचे त्यांनी वाळूंज यांना कळविले आहे.
वाचा:
यावरून काही तरी गडबड असल्याचा संशय वाळूंज यांनी व्यक्त केला आहे. ‘पावती लिहित असताना त्यात कार्बन पेपर टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे तेव्हापासूनच मला शंका होती. त्यामुळे मी पाठपुरावा सुरू केला. कोणतेही रेकॉर्ड नसलेल्या पुस्तकाच्या आधारे दंड वसुली झाली आहे. अशा स्वरुपाच्या पावत्या फाडल्या गेल्या असतील तर नगर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून यासंबंधी तक्रार करणार आहोत. करोनाच्या काळात नियम मोडल्याबद्दल नागरिकांकडून सर्वत्रच दंड वसूल करण्यात आला. नगर जिल्ह्यात हा वेगळाच अनुभव आल्याने शंका घेण्यास वाव आहे. सुशिक्षित लोकही सहज फसू शकतील अशा या पावत्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे काय झाले असेल? या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आपण राहणार नाही,’ असेही वाळंजू यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times