मुंबई: उद्या राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालय अथवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

शिवसेना-भाजपचा काडीमोड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली भेट झाली ती पुण्यात. एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुण्यात आले असता प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताला गेले होते. ही धावती भेट सोडली तर दोन्ही नेत्यांमध्ये त्यानंतर भेट झालेली नाही. साधारणपणे एखाद्या राज्यात नवं सरकार आल्यानंतर तेथील मुख्यमंत्री पुढच्या काही दिवसांत पंतप्रधानांची भेट घेत असतात व त्यांच्यापुढे राज्याशी निगडीत मुद्दे मांडत असतात. त्याच उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीवारीवर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेतील. शेतकरी कर्जमाफी योजनेसह विविध योजना तसेच प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या अनुशंगाने निधीची कमतरता भासू नये म्हणून केंद्राने सढळहस्ते मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या भेटीत मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

…म्हणून भेटीला महत्त्व

पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्या भेटीला राजकीय दृष्ट्याही तितकंच महत्त्व आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत उभा संघर्ष पेटला. त्यातून शिवसेनेला हुलकावणी देत अजित पवारांच्या साथीने सत्ता स्थापन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेने त्यापेक्षाही तगडा झटका दिला. शरद पवार यांच्या पाठबळाच्या जोरावर शिवसेनेने भाजपला सत्तेतून दूर जायला भाग पाडले. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व अशी महाविकास आघाडी आकाराला आली आणि सत्तेत विराजमान झाली. या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील ही पहिली अधिकृत भेट असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

सोनिया-राहुल यांनाही भेटणार?

दिल्लीवारीत मुख्यमंत्री ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही भेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया व राहुल उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी उद्धव यांना एका पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उद्धव या दोन्ही नेत्यांची भेट घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here