मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण, आगामी काळात प्रत्येक राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हा विस्तार महत्त्वाचा मानला जातोय. या मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रातून भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची वर्णी लागल्यामुळे याचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला धक्का बसणार अशीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशात राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदाचा भाजपला काय फायदा होणार जाणून घेऊयात.

राणेंच्या मंत्रिपदामागे भाजपची रणनीती काय आहे?
महाराष्ट्रातील राजकारणात नारायण राणे मोठं नाव असून ते अत्यंत महत्त्वाकांक्षी राजकारणी आहेत. त्यांच्याविषयीची सगळ्यात खास बाब म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने युतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषवलं. पण त्यांचा शिवसेनेशी घरोबा फार काळ टिकला नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा हात धरला.

काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी महसूलमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. काँग्रेसमध्ये कॅबिनेट मंत्री असताना अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी हट्ट धरला होता. पण तिथे त्यांना साथ न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकला. काँग्रेसशी काडीमोड करताच त्यांनी भाजपशी मैत्री केली. भाजपमधून आता राणेंना केंद्रात जागा मिळणार आहे. याचा महाराष्ट्रात भाजपला नक्की फायदा होणार आहे.

आक्रमक नेते म्हणून राणेंची ओळख
नारायण राणे यांनी राजकारण अनेकवेळा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. मंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासन सांभाळण्यास ते सक्षम आहेत. एकीकडे राणेंचा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे राणेंच्या केंद्रातील पदामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे कोकणात शिवसेनेचा बोलबाला आहे. त्यामुळे तिथे राणेंचा बुलंद आवाज भाजपसाठी फायद्याचा ठरेल. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा शिवसेनेला धक्का बसतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

नारायण राणे कट्टर शिवसेनाविरोधी
बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या उपस्थितीतच त्यांनी शिवसेना सोडली, हे महाराष्ट्रात सर्वज्ञात आहे. उद्धव ठाकरेंशी जमलं नाही हे शिवसेना सोडण्यामागचं मुख्य कारण होतं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणेंनी प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे आता केंद्रातून ताकद लावून शिवसेनेला घेरण्यात आणखी बळ मिळेल अशी राजकीय चर्चा आहे.

मुंबई महापालिका निवडणुका
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगर पालिका ओळखली जाते. पुढच्या वर्षी पालिका निवडणुका आहेत. गेल्या २ वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनाची सत्ता आहे. यावेळी पालिकेतून शिवसेनेला उखडून काढू असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्री केलं तर ते भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं.

महाराष्ट्रासाठी मराठा चेहरा महत्त्वाचा
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकस आघाडी आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या मुद्द्याचं भांडवल होणार आहे. नारायण राणे यांनीही अनेकवेळा मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे. यावरून राणेंनी फक्त महाविकस आघाडीच नाहीतर छत्रपती संभाजींनाही लक्ष्य केलं होतं. यामुळे याचा फायदा घेत राणे यांच्या माध्यमातून मराठा तरुणांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे असे मंत्री आहेत. यामध्ये नितीन गडकरी वगळता राज्यात कुणाचाही मोठा जनाधार नाही. यामध्ये राणेंचा विचार केला तर त्यांना माणणारा मोठा वर्ग कोकणात आणि मुंबईत आहे. त्यामुळे याचाही फायदी भाजपला होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here