मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण, आगामी काळात प्रत्येक राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हा विस्तार महत्त्वाचा मानला जातोय. या मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रातून भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची वर्णी लागल्यामुळे याचा शिवसेना आणि भाजपच्या मैत्रीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

नारायण राणे यांना मंत्री केलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होणार आहे. यामुळे परिणाम थेट शिवसेना आणि भाजपमधील संबंधांवर होणार आहे. राणेंचा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे राणेंच्या केंद्रातील पदामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे कोकणात शिवसेनेचा बोलबाला आहे. त्यामुळे तिथे राणेंचा बुलंद आवाज भाजपसाठी फायद्याचा ठरेल. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा शिवसेनेला धक्का बसतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राणे म्हणजे शिवसेनेला नांगर
महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री केलं. पण उद्धव ठाकरे यांच्याशी जमलं नाही यामुळे राणेंनी शिवसेनेला रामराम केला. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी सतत ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केलं आणि त्यांच्यावर टीका केली.

राणे यांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केला. परंतु उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना त्यांनी कधीच जुमानलं नाही. राणे आजही उद्धव आणि आदित्यवर हल्ला करण्याची संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे टीका करताना राणे शब्दांची मर्यादा विसरतात. म्हणूनच राणे हे शिवसेनेला नांगर असं म्हटलं जातं. अशात राणेंच्या मंत्रिपदामुळे हा संघर्ष आणखी वाढणार असल्याची चिन्ह आहेत.

शिवसेनेच्या जखमेवर मीठ
नारायण राणे यांना मोदी मंत्रिमंडळात मंत्री केलं तर ते शिवसेनेच्या जखमांवर मीठ टाकण्यासारखे असेल अशीही राजकीय चर्चा आहे. कारण, जेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती त्यानंतरही राणे यांना भाजपामध्ये स्थान मिळू नये यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

खंरतर, परस्पर मतभेदांमुळे शिवसेना आणि भाजपने युती तोडली. राणे आधी भाजपचे सहकारी नेते झाले आणि त्यानंतर राज्यसभेत त्यांच्या कोट्यातून खासदार झाले. भाजपमधून नारायण राणे यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता ते केंद्रातील ताकद वापरून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करतील अशी राजकीय चर्चा आहे.

शिवसेना-भाजप युती कठीण होणार?
गेल्या काही दिवसांआधीच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत अर्धा तास भेट घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा सूर बदलला होता. खुद्द संजय राऊत यांनी मोदींच्या कौतुकाचे पूल बांधले होते.

इतकंच नाहीतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींसारखा दुसरा चेहरा नाही आणि पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधान होतील, असेही संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे शिवसेना-भाजप परत येणार अशी शक्यता होती. नारायण राणे हा शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे राणेंना मंत्री बनवण्याचा अर्थ युतीच्या मार्गात अडथळे येणार का हे आता काळच सांगेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here