हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ९ जुलैनंतर राज्यभर पावसाचं पुन्हा कमबॅक होईल. यामध्ये रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्श, कोकणात पाऊस दमदार हजेरी लावेल. आजच्या हवामानाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या काही तासांमध्ये ठाण्यासह काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसतील. तर मुंबई, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.
पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उद्या पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे. पुढच्या तीन दिवसांत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरतील. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. हवामान खात्याकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या पाच दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा असून पहिले तीन दिवस ढगाळ वातावरण असेल पण नंतर कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
९ जुलैनंतर कोकणात जोर वाढणार
पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर ८ जुलैला विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times