पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय योगेश दत्तू गायकवाड याने सैन्यात नोकरी मिळण्याच्या नावाखाली 20 हून अधिक तरुणांची फसवणूक केली आहे. योगेशसोबत अहमदनगर इथली संजय शिंदे नावाची व्यक्तीही या फसवणूकीत सामील होती. तो स्वत: ला लोकांसमोर योगेशचा अंगरक्षक सांगायचा. पोलिसांनी संजय आणि योगेश यांच्याकडून 12 सैन्य गणवेश व इतर गुन्हेगारी साहित्य जप्त केले आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 53 महिलांशी अफेअर चालवत होता. तो महिलांद्वारे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचत असे आणि नंतर सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक करत असे.
आरोपीने केले आहेत ४ विवाह
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, योगेशने आतापर्यंत चार विवाह केले आहेत. त्यांच्या दोन बायका पुण्यातील आहेत, एक अमरावती आणि एक औरंगाबादची आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील जावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दोन विवाह आळंदीच्या धर्मशाळांमध्ये व इतर दोन मंदिरात झाले. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना लक्ष्य करत होता. तपासणीत योगेशने 53 महिलांना डेट केल्याचे आढळून आलं आहे.
21 जून रोजी बिबवेवाडी येथील एका महिलेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा योगेशचा हा काळा व्यवसाय उघडकीस आला. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, योगेश महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसमोर स्वत: ला मेजर किंवा कर्नल सांगायचा. मी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असल्याचे सांगत तो जेव्हा-जेव्हा महिलांना भेटायचा तेव्हा नेहमीच सैन्याचा गणवेश घालायचा. त्याच्याकडून पोलिसांनी लष्कराचे १२ गणवेश, २६ नवीन शूज, दोन मोटारसायकली, दोन चारचाकी, एक ट्रंक, सेल फोन, रबर स्टॅम्प आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times