रत्नागिरी : भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे राज्यात एकच राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं. नारायण राणेंच्या मंत्रिपदामुळे राज्यात शिवसेनेला धोका आहे अशा चर्चा रंगत असताना यावर खासदार विनायक राऊत यांनी चोख प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या मंत्रिपदामुळे काहीही फरक पडणार नाही, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

‘नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरीसुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणं हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही’, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपदं मिळतात हेच मोठं दुःख आहे. ते मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो याचं दुःख फार मोठं असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

तसेच मुंबई आणि शिवसेनेचं जे नातं आहे. हे अभेद्य नातं मागच्या 30 वर्षांपासून आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार राऊत यावेळी म्हणाले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here