नागपूरः मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार आगमन केलेला पावसाने त्यानंतर दीर्घ विश्रांती घेतली होती. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

जून महिन्यात दमदार हजेरी लावणारा पाऊस मागील १५ दिवसांपासून गायब झाला आहे. जून महिन्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाचा फारसा जोर दिसला नाही. जुलै महिन्यात पाऊस गायब झाला आहे. ढग दाटून येत असले तरी पावसाचा शिडकावा होत नसल्याने हवेतील उकाडा असह्य होत असून घामाच्या धारांनी माणूस बेचैन होत आहे. एकीकडे शहरात पावसाची प्रतीक्षा असताना शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. आता विदर्भासह राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. नागपुरातील पूर्व दक्षिण भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक वस्तीत पाणी शिरल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान विभागानं नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

शुक्रवार दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी वीज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

दरम्यान, साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत वीज पडण्याचा धोका असल्या कारणाने पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक शेतीची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here