म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भावी पत्नीसह सासूला साकेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असणाऱ्या मुंबईच्या तरुणांच्या कारला जळगाव – भुसावळ महामार्गावर अपघात होवून या मुंबईच्या तरुणासह कारमधील त्याच्या मित्राचा देखील मृत्यू झाला आहे. महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ कार घसरुन कलंडल्यामुळे आज गुरुवारी पहाटे हा अपघात झाला आहे. अभिजित सुभाष पसारे (वय ३०, रा. डोंबिवली) व पवन नंदू बागुल (वय २७, रा. मानपाडा) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघे मित्र आहेत. तरसोद फाट्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे, तर तेथून पुढे केवळ दुपदरी महामार्ग असल्याने त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदा पोलिसांनी वर्तविला आहे. (two mumbai youths lost their lives in a tragic on the highway in )

अभिजित व पवन दोघे मुंबईत खासगी कंपनीत कामाला आहेत. अभिजित याचा काही महिन्यांपूर्वी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका तरुणीशी साखरपुडा झाला आहे. त्याचे भावी सासरे आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. त्यानिमित्ताने अभिजीतची भावी पत्नी व सासु दोघे मुंबईला आले होते. रुग्णालयाचे काम आटोपल्यानंतर सात जुलै रोजी अभिजीत कार घेऊन सासु व भावी पत्नी यांना सोडण्यासाठी साकेगाव येथे आला होता. त्याचा मित्र पवन याची पत्नी मालेगाव येथे माहेरी आलेली होती. पत्नीस मुंबईत परत घेऊन जायचे असल्याने अभिजीतसोबत साकेगाव येथे पवनही आला. दोघेजण साकेगाव येथे आले. भावी पत्नी व सासु यांना सोडल्यानंतर रात्री उशिरा पवन व अभिजीत कारने मुंबईकडे निघाले होते.

क्लिक करा आणि वाचा-
आज गुरुवारी पहाटे तीन वाजता तरसोद फाट्याजवळ आल्यानंतर तेथे चौपदरी रस्ता संपल्यानतंर कारचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना पुढील रस्त्याचा अंदाज आला नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने भरधाव कार उजव्या बाजुला वळवताच सहा ते सात वेळा कार कलंडली. चौपदरीकरण जेथे संपले आहे तेथे सूचना फलकच नसल्यामुळे त्यांना रस्त्याचा अंदाज आला नव्हता. ही कार सुमारे ७० ते ८० मिटर अंतर कापुन रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढीगाऱ्याजवळ थांबली. कार कलंडत असताना अभिजीत गाडीतून बाहेर फेकला गेल्याने डोक्यास मार लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पवन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिजीतचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला तर जखमी पवन याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला.

क्लिक करा आणि वाचा-
त्यांच्याजवळ मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर अभिजीतचे मामा चंद्रकांत पांडूरंग जोशी (रा. खेडी, जळगाव) यांना तर पवनचे पाचोरा येथे राहणाऱ्या नातेवाईकांना कळवण्यात आले. सकाळी सात वाजता पवनचा शालक रुग्णालयात पोहोचला होता. मृत पवन याच्या पश्चात पश्चात आई मनिषा, पत्नी जयश्री असा परिवार आहे. तर मृत अभिजीत याच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here