रत्नागिरी: नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेत जोरदार गटबाजी उफाळून आली आहे. या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या राजापुरातील स्थानिक विभागप्रमुखावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्याचा निषेध करत आज विभागातील तब्बल २२ शाखाप्रमुखांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेकडून याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नाणार प्रकल्पावरून स्थानिक शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राजापुरातील सागवे विभागाचे विभागप्रमुख राजा काजवे यांनी नाणार प्रकल्पाचे जाहीरपणे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हाप्रमुखांनी पक्ष शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पदावरून हकालपट्टी केली. या कारवाईचे लगेचच विभागात पडसाद उमटले. संघटनेच्या निर्णयानुसारच सागवे यांनी रिफायनरी प्रकल्पा पाठिंबा दिला होता. असे असताना त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक आहे, असे नमूद करत कारवाईच्या निषेधार्थ उपविभागप्रमुख तसेच २२ शाखाप्रमुखांनी तालुकाप्रमुखांकडे सामूहिक राजीनामा सोपवला. शिवसैनिकांच्या या पवित्र्याने संघटनेत मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे नेते होणार नाही, असे म्हणत असताना स्थानिक शिवसैनिक मात्र प्रकल्पाच्या बाजूने असल्याचेच यातून स्पष्ट दिसत आहे.

शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

शिवसेनेने सुरुवातीपासूनच नाणार प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या आग्रहावरूनच फडणवीस सरकारने हा प्रकल्प नाणारमधून गुंडाळण्याची पावले टाकली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये नाणार प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध झाली. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ अशा टॅगलाइनने ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिवसेनेचा नाणारला आतून पाठिंबा असल्याचे तर्क यातून काढले गेले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्टीकरण देत नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here