पुण्याजवळील भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड ३१ कोटी रुपयांचा बाजारभाव असताना फक्त ३.७५ कोटी रुपयांत खरेदी करण्याच्या प्रकरणात ‘ईडी’कडून तपास सुरू आहे. यामुळे अनेक कोटी रुपयांच्या सरकारी महसुलाचे नुकसान झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्याच प्रकरणावरुन ईडीने बुधवारी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. त्यानंतर गुरूवारी खडसेंची कसून चौकशी करण्यात आली.
खडसे यांना सकाळी ११ वाजता चौकशी बोलवण्यात आले होते. साधारण १२ वाजताच्या सुमारास त्यांची चौकशी सुरू झाली. रात्री ८ वाजतापर्यंत ही चौकशी सुरू होती. यापुढेही जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा चौकशीचा समन्स बजावला जाईल, असं ‘ईडी’ च्या अधिकाऱ्यांनी खडसे यांना कार्यालयातून निघताना आवर्जून सांगितले. त्यामुळेच ही चौकशी अखेर नसून खडसे यांच्यापुढील अडचणी अद्याप संपल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे.
याप्रकरणी अटकेत असलेले गिरीश चौधरी यांची पुढील तीन दिवस खडसेंनी दिलेल्या माहितीच्या आधारे उलटतपासणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दुपारी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times