पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अवैध सावकारकीच्या विरोधात मोहीम उघडली आहे. अवैध सावकारीची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना पोलिसांनी केले आहे. त्यानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पोलिसांनी एका लाखासाठी दिवसाला एक हजार रुपये व्याज घेणाऱ्या सावकारावर कारवाई केली आहे. एजाज उर्फ भोप्या सय्यद (रा.कर्जत) असे या सावकाराचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने एका व्यक्तीने गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. मात्र त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये असा होता. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने संबंधित व्यक्तीने सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते. त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रीवाढ रक्कम लावल्याने मुद्दल रक्कम ही तब्बल ६ लाख रुपयांवर गेली. संबंधित व्यक्तीने व्याजापोटी सय्यद याला ३ लाख रुपये दिले. ३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील, असे सय्यद याने संबंधित व्यक्तीला सांगितले. तसेच पैसे वसूल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ केली. याशिवाय संबंधित व्यक्तीच्या चारचाकी गाडीची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले. आरोपी सय्यद याच्याकडून देण्यात आलेल्या त्रासामुळे अखेर संबंधित व्यक्तीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी एज्जाज सय्यद याच्यावर कारवाई करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times