पिंपरी: कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुभाष विश्वनाथ साह (वय ३३, रा. लेबर कॅम्प, ताथवडे. मूळ रा. चकईनायत, ता. जि. वैशाली, बिहार) असे जखमी कामगाराचे नाव असून, ३ फेब्रुवारीला हा धक्कादायक प्रकार घडला. जखमीने याप्रकरणी बुधवारी (१९ फेब्रुवारी) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहम्मद अन्वर झुमरातिया (वय ४०, रा. तापकीरनगर, पुणे), संतोषकुमार हरकराम (वय ३६, रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे सर्व्हिस रोडच्या बाजूला एका बांधकाम साइटचे काम सुरू आहे. त्या साइटवर आरोपी मोहम्मद हा ठेकेदार असून आरोपी संतोषकुमार फोरमन आहे. तर जखमी फिर्यादी हे ठेकेदाराकडे सेंट्रिंगचे काम करत होते. सुभाष यांनी त्यांच्या कामाचे पैसे आरोपी ठेकेदाराकडे वारंवार मागितले. पैसे मगितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून ३ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता सुभाष यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचीसच्या काडीने सुभाष यांना पेटवून दिले. तसेच आरोपीच्या साथीदारांनी सुभाष यांना इंजेक्शन देऊन घडलेली हकीकत न सांगता खोटी हकीकत सांगण्यास भाग पाडले. जखमी सुभाष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंजवडी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here