‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा जमा करणं हे चार महिन्याचं काम आहे, असं मी म्हणालो होतो. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द केलेलं नाही, आरक्षण त्याच ठिकाणी आहे. ज्या जाती आहेत त्या मागास नाहीत, हेही सांगितलेलं नाही. फक्त इम्पिरिकल चौकशी करण्यासाठी सांगितलं आहे आणि ही चौकशी ४ महिन्यात पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला द्या, आम्ही करतो. मी पुढील २५ वर्ष राजकारण करणार आहे, म्हणून मी एखादी गोष्ट बोलतो तर ती विचारपूर्वक बोलतो,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चांना उत्तर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या परळीच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न देण्यात आल्याने भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या नाराज असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच्या चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या आहेत. ‘पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी सर्वात आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी अशी भूमिका मांडली आणि हीच भाजपची भूमिका आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
पुण्यातील पत्रकार परिषदेत फडणवीसांची फटकेबाजी, जाणून घ्या ठळक मुद्दे :
– अधिवेशनादरम्यान विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी कारभार केला.
– खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांना निलंबित केलं.
– ओबीसींच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष उघडे पडले.
– ओबीसींचा मुद्दा अंगावर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी तो केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न केला.
-जोपर्यंत ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे.
– अधिवेशन जवळ आलं की लगेच नवा कोणतातरी विषाणू येतो. अधिवेशनात लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times