कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध खरेदी आणि विक्री दरात (Gokul ) वाढ केली आहे. यामुळे एकीकडे उत्पादकांना दिलासा असला तरी मुंबई आणि पुणे येथील विक्रीत प्रतीलिटर दोन रूपये वाढ करण्यात आली आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवीन सत्ताधारी आघाडीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दूध खरेदी व विक्री दरातील वाढीबाबत घोषणा करताना दूध संघाचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी सांगितले की, अमूल दूध संघाने विक्री दरात वाढ केली होती. इंधन आणि प्रक्रिया खर्चात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर दूध विक्री दरात वाढ करणे आवश्यक होते. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व कोकण वगळता इतर ठिकाणी होणाऱ्या विक्री दरात लिटरला दोन रूपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबई, पुणे या शहरासह इतर ठिकाणच्या ग्राहकांना वाढीव दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.

म्हशीच्या दूध खरेदी दरात २ रुपये तर गायीच्या दुधाच्या खरेदी दरात १ रुपयाची वाढ
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, दूध संघावर आमची सत्ता आल्यापासून विविध मार्गाने काटकसर सुरू केली आहे. दूध उत्पादकांना दोन रूपये जास्त दर देण्याची घोषणा आम्ही निवडणुकीत केली होती. त्यानुसार दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दूध दरात दोन रूपये तर गायीच्या दूध खरेदी दरात एक रूपये वाढ करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात म्हणजे ११ जुलैपासून करण्यात येईल.

दूध खरेदी दरात वाढ केल्याने संघावर ७१ कोटीचा बोजा पडणार आहे. पण, मुंबई आणि पुणे शहरातील दूध विक्री दरात वाढ केल्याने हा बोजा कमी होणार आहे. याशिवाय आम्ही विविध मार्गाने दरमहा १० कोटीची बचत केली आहे. या दोन्हीतून ६९ कोटीचा बोजा कमी होणार आहे. यामुळे केवळ दोन कोटींचाच बोजा संघावर पडणार आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, रोज २० लाख लिटर दूध संकलन करण्याचा आमचा मानस आहे. लवकरात लवकर हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. २० लाख लिटर दूधावर प्रक्रिया करण्याची संघाची क्षमता आहे. यामुळेच दूध संकलन वाढविण्यात येत आहे. दरम्यान, भूमिहीन शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या वतीने म्हैस खरेदीसाठी विनातारण कर्ज देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील हे म्हणाले की, संघावर नवीन आघाडीची सत्ता आल्यापासून खर्चात बचत करण्याचे विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच दूध उत्पादकांना जादा दर देणे शक्य झाले.

दरम्यान, यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here